किदाम्बी श्रीकांतसह सहकाऱयांचे ऑलिम्पिक पात्रता गुण मिळवण्याचे प्रयत्न
पॅरिस / वृत्तसंस्था
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये प्रारंभिक टप्प्यातच आव्हान संपुष्टात आलेल्या किदामी श्रीकांतचे येथे आजपासून सुरु होणाऱया अर्लीन्स मास्टर्स सुपर 100 स्पर्धेच्या क्वॉलिफायर्समध्ये मागील अपयशाची कसर भरुन काढण्याचे प्रयत्न असतील. यापूर्वी इंग्लंडमधील स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून माघार घेणाऱया सायना नेहवालचा प्रवास तंदुरुस्त होण्याकडे आहे. मात्र, बुधवारीच ती स्पर्धेतील सहभागाबद्दल निर्णय घेईल, असे संकेत आहेत.
90 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता गुण अधिक महत्त्वाचे असणार असून श्रीकांत व सायना टोकियो ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी अधिक ताकदीने प्रयत्नशील असतील.
अव्वलमानांकित श्रीकांतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून दुसरीकडे, चौथी मानांकित सायनाची सलामी लढत मलेशियाच्या किसोनाविरुद्ध होईल. ऑल इंग्लंड स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आयर्लंडच्या न्यूगेनविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर आव्हान संपुष्टात आलेल्या श्रीकांतची दुसरी लढत राष्ट्रीय सहकारी अजय जयरामविरुद्ध होऊ शकते. जयरामची सलामी लढत कॅले कोलोजोनेनविरुद्ध होणार आहे. माजी राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप येथे पाचवा मानांकित असून त्यालाही पहिल्या फेरीतून बाय मिळाली तर दुसऱया फेरीत त्याची लढत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हविरुद्ध होऊ शकते. अन्य लढतीत सातव्या मानांकित एचएस प्रणॉय, सिरिल वर्मा व चिराग सेन यांनाही पहिल्या फेरीतून बाय मिळाली आहे. 2018 सारलोर्लक्स ओपन चॅम्पियन शुभांकर डे हा डेन्मार्कच्या जेगर होल्मविरुद्ध लढेल. राष्ट्रकुल कांस्यजेते अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी ही आठवी मानांकित जोडी डेन्मार्कच्या ऍमेली व प्रेजा यांच्याविरुद्ध लढेल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी हे फ्रान्सच्या ज्युलियन माईओ व लि पॅलेर्मोविरुद्ध लढतील. पुरुष दुहेरीत सातवे मानांकित एमआर अर्जुन व धुव कपिला हे इंग्लंडच्या मॅथ्यू कॅरे व इथन व्हान लिऊवेन यांच्याविरुद्ध खेळणार आहेत.