वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
हर हर महादेव, श्री ब्रह्मलिंगेश्वर महाराज की जयच्या जयघोषात अलतगा गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंगेश्वरची यात्रा व इंगळय़ांचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुढीपाडव्यानिमित्त उत्साहात पार पडला.
अलतगा गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंगेश्वर जागृत देवस्थान आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱया दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडतो. यावर्षीही गुढीपाडव्यादिवशी श्री ब्रह्मलिंगेश्वर मंदिरमध्ये विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडले.
पाडव्याच्या दुसऱया दिवशी गावातील अनेक भक्तांनी बैलगाडी व ट्रक्टरमधून गावच्या शेतवडी परिसरातील झाडांच्या फांद्या तोडून मिरवणुकीने गावामध्ये आणल्या. सदर ओल्या लाकडांची बँड-ताशांच्या निनादात व गुलालाच्या उधळणीमध्ये संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली.
दुपारी 2 वाजता श्री ब्रह्मलिंगेश्वर मंदिर आवारात सर्व ओली लाकडे एकत्र करून ती पेटवून इंगळय़ा तयार करण्यात आल्या. सायंकाळी 6 वाजता सर्व प्रकारच्या विधिवत पूजा झाल्यानंतर हजारो भाविकांनी धगधगत्या इंगळय़ांमधून धावून आपला नवस फेडला.
शांततेमध्ये यात्रा पार
अलतगा गावची सदर यात्रा प्रत्येक वर्षीप्रमाणे अगदी शांततेमध्ये पार पडली. देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूमसह इतर सदस्य, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ यांनी यात्रा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.