ऑनलाईन टीम / जूनो :
अमेरिकेच्या अलास्का राज्यात दोन छोट्या विमानांची हवेत जोरदार धडक झाली. या भीषण दुर्घटनेत दोन्ही विमानातील 7 जणांचा मृत्यू झाला. अलास्का राज्यातील केनाई शहराजवळील सोल्डोट्ना विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कारोलिना येथून 4 पर्यटकांना घेऊन एक विमान जात होते. या विमानात पायलट आणि एक गाईड होता. तर दुसऱ्या विमानात एक लोकप्रतिनिधी होते. ते स्वतःच हे विमान चालवत होते. केनाई शहराजवळील सोल्डोट्ना विमानतळाजवळ दोन्ही विमानांची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही विमानातील 7 जण ठार झाले. कोणीही बचावले नाही.
मृत्युमुखी पडलेल्या लोकप्रतिनिधींचे नाव गॅरी नोप असून, ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे राज्य विधानसभा सदस्य होते. दुर्घटनाग्रस्त झालेले एक विमान डी हॅव्हिलंड डीएचसी -2 बीव्हरचे तर दुसरे पायपर-पी 12 हे दोन इंजिनाचे विमान असल्याची माहिती फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिली आहे. एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डाचे (एनटीएसबी) अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत.