कराडात भरदिवसा हल्लेखोरांनी वार करून संपवले
प्रतिनिधी/ कराड
सतरा वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी बारा डबरे परिसरात घडली. तीन हल्लेखोरांनी भरदिवसा हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला. आदित्य गौतम बनसोडे (वय 17, रा. बाराडबरे परिसर, कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाच्या घटनेने परिसर हादरला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले. दरम्यान आदित्यचे वडील गौतम बनसोडे यांनी शहर पोलिसात खबर दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य बनसोडे हा कुटुंबासह बाराडबरे परिसरात वास्तव्य करत होता. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आदित्य बाराडबरे येथील एका किराणा स्टोअर्ससमोर उभा राहिला होता. याचवेळी तीन संशयित हल्लेखोर तेथे आले. त्यांची आदित्यशी बाचाबाची झाली असावी. तिघांनीही काही कळायच्या आत आदित्यवर हल्ला चढवला. त्याच्या पोटात धारादार शस्त्राने खोलवर वार केल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्लोखोर वार करून तेथून पसार झाले. अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आदित्यवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. नागरिकांच्या मदतीने आदित्यला खासगी वाहनातून वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून कृष्णा रूग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. हा प्रकार समजल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांची माहिती घेण्यास सुरूवात केली. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी छापे टाकत तपासणी सुरू केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनेच्या अनुषंगाने चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी पंचनामा करत होते.
खून नेमका कशासाठी?
अवघ्या सोळा वर्षांच्या आदित्यवर भरदिवसा वार करून त्याला संपवण्यात आले. या घटनेमुळे त्याच्या पालकांसह परिसरातील अनेकांना धक्का बसला होता. आदित्यचा खून नेमका कशासाठी झाला याचा शोध पोलीस घेत होते. यापुर्वीही महाविद्यालयीन युवकांच्या खुनाच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे.