पतीस मेढा पोलिसांकडून अटक
प्रतिनिधी/ मेढा
मेढा (ता.जावली) येथे एका परप्रांतीय 17 वर्षीय अल्पवयीन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन विवाहित महिला ही दोन महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी महिलेच्या पतीस अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी व आत्महत्या केलेली महीला हे दोन्ही बिहार राज्यातील समस्तीपुर जिह्यातील आहेत. आत्महत्या केलेली महिला ही अल्पवयीन असताना देखील आरोपीने तिला आमिष दाखवून, तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेत तिच्याशी लग्नग्न केले. वेळोवेळी तिच्याशी भांडण तसेच जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध केले. यातून ती महिला दोन महिन्याची गरोदर राहिली. तिच्यासोबत वारंवार होत असणाऱया भांडण तंटय़ाच्या त्रासाला कंटाळून तिने मेढा येथील राहत असलेल्या खोलीत पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेच्या भाऊ राहुल राय याने मेढा पोलीस ठाण्यात आरोपी महंमद आझाद जासीम, (वय 22, रा.गंगोली ता. विभूतीपुर, राज्य बिहार, सध्या रा. मेढा) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून मेढा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास मेढा पोलिसांकडून चालू आहे.