वार्ताहर/ वरकुटे
माण तालुक्यात सोमवार मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला. पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे – मलवडी परिसरात सोमवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळाला सुरूवात झाली आणि मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली.
सोमवारी दिवसभर पाऊसाचे वातावरण दिसत होते. त्यातच सूरुवातीला मध्यरात्री 12 . 20 वा. चक्रीवादळाला सुरूवात झाली. बघता बघता विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडला . या मुसळधार पावसामुळे या परिसरातील द्राक्ष बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
या चक्रीवादळात पळसावडे येथील कुंडलिक यादव यांची 10 ते 12 दिवसांत उतरायला येणारी द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे. संपूर्ण बाग खाली पडून घडांचे पुर्णपणे नुकसान झाले . येणाया अजून घडात साखर उतारलेली नाही. आंबटपणा गेला नाही. द्राक्ष मण्यांची जमीनीवर चादर पसरल्यागत मणी पसरले आहेत. मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड खराब झाले आहेत. पुर्ण भरात आलेली द्राक्ष बागेची पावसामुळे नुकसान झाले आहे.
या चक्रीवादळाचा व अवकाळी पावसाच्या दणक्याने द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या अवकाळी पावसाचा फटका बसला असून यादव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याची कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.
येत्या 10 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. अशा अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. पुढील पाच दिवसांत पावसाची वाढ अपेक्षित आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.