प्रतिनिधी / खेड
मुंबई-गोवा महामार्गावर क्षमतेपेक्षा अधिक साहित्याची वाहतूक करणारे पाच मालवाह ट्रक येथील पोलिसांनी रविवारी सकाळी ताब्यात घेतले. हे पाचही ट्रक सायंकाळी उशिरापर्यंत गोळीबार मैदानात उभे होते.
महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार येथील पोलिसांनी रविवारी सकाळी 10 च्या सुमारास महामार्गावरून धावणारे 5 मालवाहू ट्रक ताब्यात घेतले. पाचही मालवाहू ट्रकची तपासणी करण्यात आली असता ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त साहित्य असल्याचे आढळले. त्यानुसार हे पाचही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईचा अधिक तपशील सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकला नाही.