प्रतिनिधी /वास्को
मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले यांनी काल मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पालिकेतील 16 नगरसेवकांनी त्यांच्याविरूध्द सोमवारी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. मात्र, या ठरावावर चर्चा होण्यापूर्वी उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
श्रध्दा महाले या माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थक असून आता त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या बनलेल्या आहेत. त्यामुळे भाजपाची सत्ता असलेल्या मुरगावच्या पालिका मंडळात त्यांना उपनगराध्यक्षपदी ठेवणे शक्य नव्हते. माजी आमदार व काँग्रेसचे उमेदवार कार्लुस आल्मेदा यांचा पराभव होताच. पालिका राजकारणाला सुरवात झाली. मात्र, श्रध्दा महाले यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे.