तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जायपत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून खांडवी येथे पोलिसांनी सापळा लावून बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५इ ६५क ६५ड आणि ८३ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुका पोलिसांचे आणि पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांचे कौतुक होत आहे.
“पकडण्यात आलेली संपूर्ण दारू आणि त्या बाटल्यांवर असलेले बॅच नंबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने तपासून ही दारू कोणत्या दुकानातून आणली का नारी येथेच बनवली आहे, याची खात्री होऊन आणखीन मोठे मासे पोलिसांच्या हाती लागतील असे वाटते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक आहे ज्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसेल.”
अधिक माहिती अशी की, पोलिसांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी समजली की, शेंद्री कडून कुर्डूवाडी बार्शी रोडने खांडवीकडे एक पीकअप टेम्पो टेंगो पंचचे बॉक्स घेऊन येत आहे. यामुळे तात्काळ पोलिसांनी खांडवी गावचे पश्चिमेस रोडवरील स्पिडब्रेकर जवळ न्युडायमंड या हॉटेलच्या पुढे सदरचे वाहन थांबवुन रोडचे बाजुला घेतले व चालकास ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली. तर त्यामध्ये रिकामे कॅरेट लावलेले होते व कॅरेटच्या पुढील भागात टँगोपंच दारूचे बॉक्स दिसून आले. त्यावर टॅम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव मोहसिन महमुद सय्यद वय ३६ वर्षे रा. नारी ता. बार्शी जि. सोलापुर असे असल्याचे सांगून सदरचा माल, टँगोपंचचे बॉक्स मी मौजे नारी येथून सागर बाळासाहेब बारंगुळे यांनी माझ्या गाडीत भरून कुर्डूवाडीच्या दिशेने घेवून ये, मी पुढे आहे असे सांगितले, मी त्याने सांगितल्या प्रमाणे कुर्डुवाडी – बार्शी रोडवरील एसार पेट्रोलपंप येथे वांगरवाडी हद्दीत जाऊन थांबलो. बराच वेळ बारंगुळे याची वाट पाहिली. त्यांचा फोनही लागला नाही, म्हणून मी परत बार्शी मार्गे नारी येथे चाललो आहे, अशी हकीकत सांगितली.
त्यानंतर टॅम्पोतील १ लाख १७ हजाराचे टँगोपंच कंपनीच्या १८० मिलीच्या एकुण ४८ सिलबंद बाटल्या असलेले ४२ दारूचे बॉक्स आणि वाहन असा एकूण ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी शहर आणि तालुक्यातून विनापरवाना बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक नेहमीच होत असते, तसेच पांगरी पोलीस ठाणे हद्दीतील नारी या भागात बेकायदेशीर व्यावसाय मोठ्या प्रमाणात चालतात येथे चंदन तस्करी, घरगुती गॅस साठा, मटका आणि डुप्लिकेट दारू बनविण्याचे केंद्रही चालतात. या बेकायदेशीर व्यवसायाला जबाबदार असलेले पोलीस यांचेवर देखील वरिष्ठांनी कारवाई करणे गरजेचे आहे.