प्रतिनिधी / सातारा :
येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या 4 जणांना स्थनिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 लाख 14 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओंकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने (सर्व रा. खटाव) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. संशयित गणेश उर्फ रजनिकांत शंकर शिंदे हा फरारी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दि. 24 रोजी खटाव गावच्या हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या पथकाने दि. 25 रोजी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओंकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, रजनिकांत शिंदे हे जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळु उपसा करून नदीपात्राजवळ वाळुचा डेपो तयार करीत होते. अंदाजे 5 ब्रास वाळूचा डेपो तयार केल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी या चौघांसह वाळुने भरलेले दोन ट्रक्टर ट्रॉली ताब्यात घेतले. असा एकून 26 लाख 14 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.