वृत्तसंस्था/ कोलकाता
हॉकीचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱया ध्यान चंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांना येथील मोहन बगान फुटबॉल क्लबने स्थापनादिवसाचे औचित्य साधत जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोव्हिड 19 महामारीचा प्रकोप अद्याप सुरू असल्याने व्हर्च्युअल वितरण सोहळय़ात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
‘त्यांना पुरस्कार प्रदान करतानाचे व त्यांच्या संदेशाचे चित्रीकरण करण्यात येणार असून क्लबच्या सोशल मीडियावर ते नंतर शेअर केले जातील,’ असे मोहन बगान क्लबचे सरचिटणीस श्रीन्जॉय बोस यांनी सांगितले. 1911 मध्ये ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंट संघाला 2-1 असे हरवून ब्रिटिशांची मक्तेदारी संपुष्टात आणत आयएफए शील्डचे जेतेपद पटकावणारा पहिला भारतीय क्लब संघ होण्याचा मान मोहन बगानने मिळविला होता. तेव्हापासून प्रतिवर्षी 29 जुलै हा ‘मोहन बगान डे’ म्हणून साजरा केला जात आहे.
‘देशातील सध्याची परिस्थिती पाहता मोहन बगान दिवस मोठय़ा प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय क्लबच्या कार्यकारिणीने घेतला आहे. कोलकातामध्ये उपलब्ध असणाऱया पुरस्कार विजेत्यांना प्रत्यक्ष जाऊन पुरस्कार प्रदान करण्यात येईल आणि जे कोलकात्यात उपलब्ध असणार नाहीत, त्यांना परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर पुरस्कार दिले जातील,’ असेही बोस यांनी सांगितले. ‘साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अशोक कुमार मोहन बगानमध्ये सामील झाले आणि राष्ट्रीय हॉकी संघात निवड होण्याआधी त्यांनी बंगालचे प्रतिनिधित्व केले होते. अलीकडेच क्लबचे फुटबॉल हक्क आरपी संजीव गोएंका समूहाने घेतले असून त्यांची आता 80 टक्के हिस्सेदारी या क्लबमध्ये आहे. त्यामुळे क्लबचे नावही बदलण्यात आले असून आता एटीके मोहन बगान एफसी असे त्याला नवे नाव देण्यात आले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही फक्त फुटबॉलचे हक्क विकले असून त्याचा मोहन बगान ऍथलेटिक क्लबशी काहीही संबंध नाही. त्यामुळे पुरस्काराचे नाव बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे या क्लबचे अर्थसचिव देबाशिष दत्ता यांनी सांगितले. यावर्षीचा ‘मोहन बगान रत्न’ पुरस्कार गुरबक्ष सिंग व पलाश नंदी (क्रिकेट) यांना देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत : मोहन बगान रत्न : गुरबक्ष सिंग (हॉकी), पलाश नंदी (क्रिकेट). जीवनगौरव पुरस्कार : अशोक कुमार (हॉकी), प्रणब गांगुली (फुटबॉल), मनोरंजन पोरेल (ऍथलेटिक्स), सर्वोत्तम फुटबॉलपटू : जोसेबा बेइतिया (वरिष्ठ), सर्वोत्तम युवा खेळाडू : सजल बाग (यू-18 संघ).