काँक्रिटीकरण सुरू असल्याने एकेरी वाहतूक
प्रतिनिधी / बेळगाव
संगोळ्ळी रायण्णा चौक ते किल्ला अशोक चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध वाहिन्या घालण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात आले होते. मात्र, मंगळवारपासून येथील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
सोमवारी अचानकपणे रस्त्याच्या खोदाईचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. संगोळ्ळी रायण्णा मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने विविध वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पण वाहतूक वळविण्याच्यादृष्टीने कोणतीच पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. मात्र, मंगळवारपासून संगोळ्ळी रायण्णा चौकातून किल्ला अशोक चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. सकाळपासून या मार्गावरील वाहतूक संगोळ्ळी रायण्णा चौकातून जुना धारवाड रोडमार्गे वळविण्यात
आली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशोक चौक ते संगोळ्ळी रायण्णा चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सध्या एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याकरिता वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मंगळवारी संगोळ्ळी रायण्णा चौकात बॅरिकेड्स लावून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना संगोळ्ळी रायण्णा चौकातून सीबीटी आणि तेथून शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्याने किल्ला अशोक चौकाकडे जावे लागत आहे. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन संगोळ्ळी रायण्णा चौक आणि आरटीओ चौकात रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहने वळविण्यास सोयीचे झाले आहे. पण रस्ता बंद असल्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सध्या संगोळ्ळी रायण्णा चौकातून किल्ला अशोक चौकाला जोडणारा रस्ता वाहतुकीस काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.