चिपळूण
वाडीतील महिलांना अश्लील शेरेबाजी करणाऱया वृध्दाला अनेकदा समज देऊनही त्याचे वागणे न बदलल्याने अखेर वाडीतील एकाने खून केल्याची घटना रविवारी येगाव-बौध्दवाडी याठिकाणी उघडकीस आली. याप्रकरणी एकाविरोधात सावर्डे पोलीस स्थानकात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नथुराम भागुराम जाधव (67, येगाव-बौध्दवाडी) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसंनी विनोद चंद्रकांत कदम (येगाव-बौध्दवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे., याबाबतची फिर्याद नमिता नथुराम जाधव (55, येगाव-बौध्दवाडी) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव हा बौध्दवाडीतील महिलांवर नेहमी अश्लील शेरेबाजी करत असे. याविषयी विनोद कदम याने ‘तुम्ही महिलांविषयी असे काही बोलू नका’ असे सांगून समज दिली होती. मात्र तरीही जाधव याने महिलांविषयी अश्लील बोलणे सुरूच ठेवल्याने याचा राग येऊन विनोद कदम याने जाधव याच्या घरात घुसून दांडक्याने नथुराम यांच्या डोक्यावर, कपाळावर जोरदार मारहाण केली. यात जाधव यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार सावर्डे पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.