नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या व यामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या अष्टपैलू युसूफ पठाणने शुक्रवारी सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. ‘क्रिकेटच्या इनिंगला पूर्णविराम देण्याची वेळ आता आली आहे’, असे निवृत्तीची घोषणा करताना तो ट्वीटरवर म्हणाला. 38 वर्षीय पठाण 2007 टी-20 विश्वचषक व 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात समाविष्ट होता. ‘मी माझे कुटुंबिय, मित्र, चाहते, संघ, प्रशिक्षक व देशवासियांचा आभारी आहे’, असे युसूफने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
माजी भारतीय डावखुरा गोलंदाज इरफान पठाणचा मोठा भाऊ असलेल्या युसूफने 57 वनडे खेळत 113.60 च्या स्ट्राईकरेटने व 2 शतके, 3 अर्धशतकांसह 810 धावा केल्या. याशिवाय, 22 टी-20 सामन्यात त्याने 146.58 च्या स्ट्राईकरेटने 236 धावा जमवल्या. केकेआरने आयपीएल जिंकली, त्या संघातही युसूफचा समावेश होता. 2012 मध्ये युसूफने भारतीय संघातर्फे शेवटचे प्रतिनिधीत्व केले होते.
‘भारतीय संघातर्फे दोन विश्वचषक जिंकले आणि विश्वचषक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलले, हे माझ्या कारकिर्दीतील दोन सर्वोत्तम क्षण आहेत. मी धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण, वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएल पदार्पण व जेकब मार्टिनच्या नेतृत्वाखाली रणजी पदार्पण केले. या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे’
-भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण