10 हजारांची घेतली होती लाच – 2014 मधील घटना
प्रतिनिधी/ वाई
फाळणी नकाशा नक्कल काढून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी वाई (ता. वाई) उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णात यशवंत मुळीक याला न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्याची हकीकत अशी, वाई उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णा यशवंत मुळीक हे यापूर्वी सातारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी तक्रारदार यांनी कोंडवे (ता. सातारा) येथील गट नंबर 179 चा फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज दिला होता. हे काम करून देण्यासाठी मुळीक यांनी त्यांना 12 हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्या कामाच्या पूर्ततेसाठी तक्रारदार सातारा कार्यालयात गेले असता मुळीक यांची वाई येथे बदली झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी मुळीक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मुळीक यांनी अर्ज आपल्याकडेच असून ते काम करून देणार असल्याचे सांगून तक्रारदार यांना वाई येथे बोलावले. दरम्यान, तडजोडी आणखी 10 हजार रुपये देण्याचे तक्रारदार आणि मुळीक यांच्यात ठरले होते.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 12 ऑगस्ट 2014 रोजी प्राप्त झाली होती. दरम्यान, तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला असता दि. 1 सप्टेंबर 2014 रोजी वाई- सातारा मार्गावर आधार हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या कडेला मारुती अल्टो क्रमांक ( एम.एच.11- एके 9978) मध्ये बसून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृष्णात मुळीक यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाअंती सातारा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारी विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी कृष्णात यशवंत मुळीक याला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात महेश कुलकर्णी यांनी जिल्हा सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले.