लॉकडाऊन मध्येही व्यवसाय तेजीत. तरुणाईत क्रेझ वाढली.
प्रतिनिधी / औंध
एरवी फक्त तालमीत व्यायामासाठी वापरली जाणारी लाकडी मुदगलची क्रेझ आता तरुणाईत वाढू लागली आहे. लॉकडाऊनमुळे काही व्यवसाय अडचणीत आले आहेत. कोरोनाचे सावट असले तरी व्यायामासाठी अहमदनगरच्या लाकडी मुदगलची मागणी देशभर वाढली आहे.
थुलथुलीत झालेल्या शरीराला आखीव आणि रेखीव आकार देण्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामाचे महत्त्व तरुण पिढीला पटल्याने सध्या तरी तरुणाईचा कल व्यायामाकडे वाढला आहे. रुंद आणि भारदस्त छाती बेडक्या दिसणारे मजबूत बाहू तयार होण्यासाठी तरुण जीम, व्यायामशाळा आणि तालमीत घाम गाळत आहेत. अलीकडे कोरोनाच्या महामारीत घरी बसून वाढलेल्या शरीराचा आकार बदलण्यासाठी देखील व्यायामातील राबता वाढला आहे. जीम तालीम बंद असल्याने घरीच उपलब्ध साहित्यावर सध्या व्यायाम सुरू आहे.
बाहुतील ताकद वाढवायची असेल शिवाय त्याचबरोबर बाहू बलदंड करण्यासाठी पूर्वी तालमीत पैलवान लढत झाल्यावर आवर्जून मुगदलच्या सहाय्याने व्यायाम करीत असत. अडीच फूट लाकडापासून तयार केलेली मुदगल ही पाच, सात, दहा पंधरा किलो वजनाची असते. आपल्या कुवतीनुसार पैलवान तीचा उपयोग करतात. आणि त्यापासून खांदयाचा व्यायाम करतात. तालमी बरोबरच अलीकडे जीममध्ये देखील लाकडी मुदगलचा व्यायामाकरीता वापर होत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी मुदगलला मागणी वाढली आहे.
अहमदनगर येथे तयार होणारी लाकडी मुदगलला तर संपूर्ण देशात मागणी वाढली आहे. तालमी बंद असल्याने काही व्यवसाय अडचणीत आले. परंतु मुदगलची मागणी वाढल्याने सध्या तरी हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. पैलवान घरी असल्याने अनेकांनी घरी मुदगलच्या सहाय्याने व्यायामातील सातत्य ठेवले आहे. शिवाय कॉलेजच्या मुलांमध्ये देखील मुदगलच्या सहाय्याने व्यायाम करण्याची क्रेझ भलतीच वाढली आहे. पैलवान दंडातील ताकद वाढावी छाती मजबूत व्हावी याकरिता मुदगलचा व्यायाम करतात. यामुळे खांदयातील सांध्याचा व्यायाम होऊन लवचिकता वाढते. फार पूर्वीपासून तालमीत मुदगलचा वापर होत आहे. आपापल्या ताकदीनुसार पैलवान मुदगलचा व्यायाम करतात. अलीकडे लोखंडी मुदगल आल्या असल्या तरी लाकडी मुदगलला पर्याय नाही कुस्ती प्रशिक्षक प्रा दिलीप बापू पवार यांनी सांगितले.
तिसऱ्या पिढीत व्यवसाय स्थिरावला.
मूळचे गुजरातचे पित्रोदा कुटुंब 50 वर्षापूर्वी नगरला स्थायिक झाले. आजोबापासून सुरू झालेला हा व्यवसाय आता तिसऱ्या पिढीत येऊन स्थिरावला आहे. लाँकडाऊन काळात सुमारे अडीचशे मुदगलची विक्री झाली आहे. सध्या तरी मुदगलला मागणी वाढतच आहे त्यामुळे व्यवसाय तेजीत आहे. संपूर्ण देशभरातून मागणी वाढतच आहे. तरुण पिढी सशक्त आणि बलदंड घडवण्यासाठी आपण केलेल्या साहित्याचा उपयोग होतो यामुळे मनाला आनंद मिळतो.- सागर पित्रोदा