प्रतिनिधी/ लांजा
महामार्गावरून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱया कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पुलावरून सुमारे 20 फूट खोल नदीपात्रात कोसळण्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी 2 च्या दरम्यान आंजणारी पुलावर झालेल्या या अपघातात चालक मुकेश यादव गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील काजळी नदीच्या पुलावरून कंटेनर (एमएच 46, बी. एफ. 5843) नदीत कोसळला. कंटेनर आंजणारी पुलाच्या तीव्र उतारावर आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊन पुलावरून काजळी नदीपात्रामध्ये कोसळला. केबिनमध्ये पाय अडकल्याने चालक अर्धा तास आत अडकून पडला होता. पोलीस व नागरिकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यात आले. चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद लांजा पोलिसांत करण्यात आली आहे.