वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने 2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे. काही कालावधीसाठी आपण क्रिकेटपासून अलिप्त राहणार असल्याचे स्टीनने ट्विटरवरुन जाहीर केले. .
2020 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी डेल स्टेनबरोबर रॉयल चँलेजर्स बेंगळूर संघाने करार केला होता. कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविली गेली. दुसऱया कोणत्याही संघाकडून खेळण्याची माझी योजना नसून काही कालावधीसाठी आपण क्रिकेटपासून अलिप्त राहणार आहे. असे स्टेन म्हणाला. 2019 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर त्याने वनडे क्रिकेटवर अधिक भर देण्याचे ठरविले होते. आणखी काही लीग क्रिकेट स्पर्धामध्ये आपण खेळू अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
2020 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेंगळूर संघाकडून खेळताना स्टेनने तीन सामन्यांत केवळ एक बळी मिळविला. बेंगळूर संघाला प्ले ऑफ सामन्यात हैदराबाद संघाकडून हार पत्करावी लागल्याने या संघाला गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.