बेंगळूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले असून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सोमवारपासून 14 दिवस लॉकडाऊन जारी केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने लसीकरणालाही गती दिली असून सोमवार 10 मेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असून नोंदणी बंधनकारक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच 10 मेपासून बेंगळूर येथील केसी जनरल, जयनगर सरकारी रुग्णालय, सर सी. व्ही. रामन रुग्णालय, ईएसआय व निम्हान्स रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
सध्या नोंदणी केलेल्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी केल्यास कोरोनाला निमंत्रण मिळू शकते. सर्वांना लस मिळणार असून गर्दी न करता व युवावर्गाने घाई न करता लसीकरण करून घ्यावे. बेंगळूर वगळता इतर जिल्हय़ांमध्ये 18 वर्षांवरील नागरिकांचे जिल्हा रुग्णालय, तालुका सरकारी रुग्णालय व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण करण्यात येणार आहे. लसींचा पुरवठा झाल्याच्या दुसऱया दिवसापासून केंद्रांना लसीचे वितरण करण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी आरोग्य सेतू ऍपवर नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी न केलेल्यांना लसीकरण करण्यात येणार नसल्याचेही मंत्री सुधाकर यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाला लवकरात लवकर लस देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आवश्यक लस पुरवठय़ासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून सर्वांना लस मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेचा 1 मे रोजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शुभारंभ केला. राज्यात 3.26 कोटी नागरिक 18 ते 44 वयोगटातील असून यासाठी 6.52 कोटी लसींची आवश्यकता आहे. यासाठी सरकारकडून 2 कोटी कोविशिल्ड, 1 कोटी कॉव्हॅक्सिन लसींची मागणी करण्यात आली आहे. सिरमकडून आतापर्यंत 6.5 लाख कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. आणखी काही लसी मे महिन्याच्या दुसऱया किंवा तिसऱया आठवडय़ात उपलब्ध होणार आहेत, असेही मंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले.