प्रतिनिधी/ पणजी
राज्यात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी तापमान बरेच वाढलेले आहे. केरळमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम म्हणून आज सायंकाळपर्यंत गोव्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
शुक्रवारी दुसऱया दिवशी म्हापसा, जुने गोवे, सांखळी व फोंडा परिसराला पावसाने झोडपून काढले. म्हापसा व सांखळी येथे प्रत्येकी 1.5 इंच, फोंडा येथे 1.75 इंच पावसाची नोंद झाली. पणजी, दाबोळी व इतर केंद्रांमध्ये तुरळक पावसाची नोंद झाली. दरम्यान, शनिवारी पावसाने विश्रांती घेतली व पहाटे संपूर्ण गोवा धुक्यामध्ये लपेटून गेला. पुढील 5 ते 6 दिवस गोव्यात सर्वत्र धुक्याचे साम्राज्य राहील.
दरम्यान, केरळमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो कर्नाटकात कारवारपर्यंत पसरलेला आहे. केरळमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून आज सायंकाळपर्यंत गोव्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खाते केरळमधील पावसावर लक्ष ठेवून आहे, असे म्हटले आहे.