पंपोरमधील चकमकीत सहकारीही ठार – सुरक्षा दलांना मोठे यश
पुलवामा / वृत्तसंस्था
काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील पंपोरच्या डगराबल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी ‘लष्कर-ए-तोयबा’ संघटनेचा मोस्ट वॉन्टेड कमांडर उमर मुश्ताक खांडेसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मुश्ताक खांडेने यावषी दोन पोलिसांची हत्या केली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या हिटलिस्टवर होता.
मुश्ताक खांडे याने पंपोर येथे आश्रय घेतल्याची माहिती सुरक्षा दलांना प्राप्त झाली होती. त्यानुसार विशेष मोहीम हाती घेत सुरक्षा दलांनी दोघांना यमसदनी पाठविले. पंपोरमध्ये चकमकीत मुश्ताक खांडेसह आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
पंपोर येथील चकमक शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झाली होती. दहशतवादी तीन मजली इमारतीत लपले असल्याने कारवाईला उशीर झाला. त्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यांनी बचावार्थ गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक झाल्याचे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी स्पष्ट केले.
काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, लष्करचा दहशतवादी उमर मुश्ताक खांडे याने यावषी श्रीनगरमधील बालाघाट येथे मोहम्मद युसूफ आणि सुहेल नामक दोन पोलिसांची हत्या केली होती. पोलीस कर्मचारी चहा घेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
8 ऑक्टोबरपासून 11 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये गेल्या आठ-दहा दिवसात दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांवर दहशतवादी हल्ले करत असल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान 8 ऑक्टोबरपासून झालेल्या नऊ चकमकींमध्ये 11 दहशतवादी ठार झाले आहेत.