प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन दिवसात बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. यामुळे प्रशासनासह नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये संकेश्वर येथील एका 25 वषीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. संकेश्वर येथे मागील गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या महिलेस लागण झाल्याचे कळविण्यात आले आहे. सदर महिला त्याची मुलगी असून तिचे वास्तव्य बेळगावातील आझाद गल्लीत आहे.
मंगळवारी सायंकाळी आझाद गल्ली परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे. ही माहिती कळताच शहरात खळबळ माजली आहे. मंगळवारी सायंकाळी या महिलेस लागण झाल्याची माहिती प्रसिद्ध झाल्याने जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 43 वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्हय़ातील दोघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
गेले दोन दिवस जिल्हय़ात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने प्रशासनासह जिल्हय़ातील नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र सायंकाळी संकेश्वर येथील 25 वषीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती हेल्थ बुलेटिनमध्ये देण्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांनाही धक्का बसला आहे.
गेल्या गुरुवारी संकेश्वर येथील इसम कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सदर महिला त्याची मुलगी असून तिचे वास्तव्य आझाद गल्लीत असल्याचे समजते. यामुळे प्रशासनाच्यावतीने आझाद गल्ली परिसर पूर्णपणे सीलडाऊन करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असून कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत कुडची-रायबाग आणि हिरेबागेवाडी येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. आता शहरातील रुग्णांची संख्याही वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्यातर्फे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे.