वृत्तसंस्था/ मुंबई
स्थानिक सकारात्मकतेच्या वातावरणाचा फायदा उठवत शेअर बाजारात सेन्सेक्सने आज विक्रमी स्तरावर बंद होण्याची संधी साधली. बीएसई सेन्सेक्स 609 अंकांच्या वाढीसह तर दुसरीकडे निफ्टी निर्देशांक 151 अंकांच्या वाढीसह बंद झाला.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराचा मूड चांगला दिसून आला. सेन्सेक्स 609 अंकांच्या वाढीसह 52,154.13 अंकांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 151 अंकांच्या वाढीसह 15,314.70 अंकांवर बंद झाला. निफ्टीने पहिल्यांदाच सोमवारी 15,340 अंकांचा स्तर पार केला होता.
बँकिंगचे समभाग जोमात
आज बाजारात जी तेजी दिसली ती बँकिंग समभागांच्या कृपेमुळे. निफ्टी बँक निर्देशांक 1 हजार 197 अंकांच्या वाढीसह 37,306.25 वर बंद झाला. बँकिंग निर्देशांकाचा हा एक विक्रमच मानला जात आहे. खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागांची खरेदी अधिक दिसून आली. ऍक्सिस बँकेचे समभाग तर सोमवारी 6 टक्क्यापर्यंत उसळी घेऊ शकले आहेत. सरकारी बँकांच्या निर्देशांकाने 2.3 टक्क्यांची तेजी दर्शवली. एसबीआयचे समभाग 4 टक्के इतके वाढले होते. दुसरीकडे रियल्टी समभागांमध्येही खरेदीचा माहोल दिसला. 3 हजार 193 समभागांमध्ये व्यवहार झाला ज्यात 1 हजार 373 समभाग तेजीत तर 1 हजार 667 समभाग घसरणीत बंद झाले आहेत. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 205.18 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. 12 फेब्रुवारी रोजी हे भांडवल 203.92 लाख कोटी रुपये होते. शुक्रवारी सेन्सेक्स 12 अंकांच्या वाढीसह 51,544.30 अंकांवर तर निफ्टी 10 अंकांच्या घसरणीसह 15,163.30 अंकांवर बंद झाला होता. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 37.33 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 596.62 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते.
जगभर आर्थिक स्थिती सुधारत असून त्याचा परिणाम बाजारात सकारात्मक दिसला आहे. इतर बाजारांचा कलही चांगला राहिला आहे. जपानचा निक्की निर्देशांक 567 अंकांच्या वाढीसह बंद झाला. कोरीयाचा कोस्पी 1.5 टक्के वाढीसह बंद झाला.
जानेवारीत किरकोळ महागाई दर नोंदवणारा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) 4.06 टक्के इतका होता, जो डिसेंबरमध्ये 4.59 टक्के इतका होता. भाज्यांसह खाण्यापिण्याच्या वस्तु स्वस्त झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. वर्षाच्या आधारावर पाहता जानेवारीत भाज्यांच्या किंमती 15.84 टक्के इतक्या कमी झाल्या आहेत. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक 1 टक्के वाढून 135.9 इतका राहिला आहे. त्याचप्रमाणे जानेवारीत जीएसटी वसुली 1.20 लाख कोटी रुपये इतकी विक्रमी झाली आहे. या साऱयाचा असर शेअर बाजारात दिसला हे खरे.