नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सोन्याचे दर अस्थिर होऊ लागले आहेत. परिणामी भारतीय सराफात सोमवारी सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 19 रुपयांनी कमी होऊन 46,826 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मात्र चांदीचा दर 646 रुपयांनी वाढून 69,072 रुपये प्रति किलो झाला. मुंबईत सोने दर प्रति 10 ग्रॅम 47,000 रुपये झाला असून चांदी प्रतिकिलो 69,800 रुपये झाली आहे. रुपयाचा दर सोमवारी सकाळी 14 पैशांनी वाढल्यामुळे सोन्याच्या दरावर त्याचा परिणाम झाला. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यात आल्यानंतर भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती.