सणासुदीमुळे मागणी वाढण्याची शक्यता
मुंबई / वृत्तसंस्था
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने उतरत आहेत. गेल्या आठवडय़ाभरात सोने 2 हजार 500 रुपयांनी, तर चांदी 10 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. बाजारात निराशेचे वातावरण असल्याने आणि कमोडिटी मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे दर पडत आहेत. मात्र, सध्या ‘अधिक मास’ सुरू असल्याने सुवर्णप्रेमींकडून कमी झालेल्या दराचा लाभ उठविला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागणी वाढल्यास सोने-चांदीच्या दरात थोडाफार चढ-उतार होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या दोन महिन्यात सोन्याचा दर 6 हजार 500 रुपयांनी, तर चांदीचा दर 18 हजार 500 रुपयांनी कमी झाला आहे. शुक्रवारीही सोन्याचा दर 0.8 टक्के पडला आणि प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा दर 49 हजार 486 रुपये झाला. दुसरीकडे चांदीचा दर 2.4 टक्क्यांनी घसरल्याने 1 किलो चांदीचा दर 58 हजार 214 रुपये झाला. शनिवारी वेगवेगळय़ा शहरांमध्ये सोन्याचा दर 49 ते 50 हजार रुपये प्रतितोळा तर चांदीचा दर 58 ते 59 हजार रुपये प्रतिकिलो इतका होता.
ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सोने 56 हजार 200 रुपये प्रतितोळा तर चांदी 74 हजार रुपये प्रतिकिलो झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून सोने-चांदी दरात घसरण व्हायला सुरुवात झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर गटांगळय़ा खात आहे. 2 हजार डॉलरवर गेलेले सोने आता 1,864.47 डॉलर प्रतिऔस झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आठवडय़ाभारत 4 टक्के स्वस्त झाले आहे. तर चांदी 22.95 डॉलर प्रतिऔस झाले आहे.