अमेरिकेत अटकेदरम्यान पोलीस अधिकाऱयाने झाडली गोळी
वृत्तसंस्था/ जॉर्जिया
अमेरिकेच्या अटलांटामध्ये पोलिसांच्या कारवाईत कृष्णवर्णीय मारला गेल्याची दुसरी घटना घडली आहे. अटलांटाच्या जॉर्जियामध्ये अटकेदरम्यान 27 वर्षीय रेशर्ड ब्रूक्सवर अधिकाऱयाने गोळी झाडली आहे. रेशर्ड याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अटलांटाच्या पोलीस प्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
जॉर्जिया ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननुसार 12 जून रोजी ही घटना घडली आहे. रेशर्ड ब्रूक्स पार्किंगमधील कारमध्ये झोपला होता. त्याने मद्यप्राशन केल्याचे वाटल्याने पोलीस अधिकाऱयांनी त्याची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांसोबत झटापट सुरू केली. ब्रूक्स एका अधिकाऱयाची टेजर (छोटे पिस्तुल) घेऊन पळाला. दुसऱया अधिकाऱयाने त्याचा पाठलाग सुरू केला असता ब्रूक्सने पिस्तुल उगारले होते. या स्थितीत अधिकाऱयाने त्याच्यावर गोळय़ा झाडल्या आहेत. अटलांटाच्या महापौर कीशा लांस बॉटम्स यांनी या घटनेमुळे पोलीस प्रमुख एरिका शील्ड्स यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे.
मिनेपोलिसमध्ये 25 मे रोजी जॉर्ज फ्लॉयड याला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. एका पोलीस अधिकाऱयाने त्याला रस्त्यावर पाडून स्वतःच्या गुडघ्याद्वारे त्याची मान सुमारे 9 मिनिटांपर्यंत दाबून ठेवली होती. या प्रकारामुळे फ्लॉयडचा मृत्यू ओढवला होता. फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या 140 शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, डेन्मार्क, नेदरलँड, फिनलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही याप्रकरणी निदर्शने होत आहेत.