प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनामुळे रत्नागिरी तालुक्यातील 3 तर चिपळूण तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबळींची संख्या 87 वर पोहचली आहे. दरम्यान, मंगळवार सायंकाळपासून 96 नवे रुग्ण आढळल्याने बाधीतांची संख्या अडीच हजाराच्या उंबरठय़ावर पोहचली आहे.
जिल्हय़ात कोरोनामुळे आणखी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील तिघांचा समावे आहे. कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 68 वर्षीय महिला व पुर्णगड येथील 61 वर्षीय रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील 86 वर्षीय रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे. जिल्हय़ात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के आहे.
नव्या 96 रूग्णांमध्ये रत्नागिरीमधील 25 जणांचा समावेश आहे. तर गुहागर 26, कामथे 21, दापोली 13, देवरुख 5, लांजा येथील एका रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत चिपळूणमधील एक व खेडमधील 4 अशा पाच जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील बाधीतांची एकूण संख्या 2487 झली आहे.
आणखी 19 जण बरे
बुधवारी उपचरानंतर बरे झालेल्या 19 रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 10, कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 2, उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1616 झाली आहे.
650 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 67 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 2487 अहवाल पॉझीटीव्ह तर 17 हजार 918 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 650 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
पावणे तीन लाख व्यक्ती जिल्हय़ात दाखल
परराज्यातून व अन्य जिह्यातून रत्नागिरी जिह्यात 11 ऑगस्ट अखेर एकूण 2 लाख 75 हजार 764 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 17 हजार 972 आहे. यामध्ये 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत 46 हजार 464 व्यक्ती जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 49 हजार 117 इतकी आहे.
दापोलीत 13 रूग्ण पॉझिटिव्ह
दापोली तालुक्यात मंगळवारी आलेल्या अहवालात 13 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दापोली आरोग्य विभागाने सांगितले. नव्याने आढळून आलेले रुग्ण हे 45 ते 70 वयोगटातील आहेत. यामध्ये दाभोळ, पिसईमध्ये प्रत्येकी 3, जालगावमध्ये 2, तर दापोली, देवके, उटमबर, बुरोंडी, लाडघर या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.