वार्ताहर/ आणे
कराड तालुक्यातील आणे येथील डोंगराकडील माळ नावाच्या शिवारामध्ये शेतीचे काम करावयास गेलेल्या धोंडिराम शामराव देसाई या शेतकऱयाच्या अंगावर बिबटय़ाने झाडावरून उडी मारून अचानक हल्ला केला. यामध्ये देसाई जखमी झाले आहेत.
सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान धोंडिराम देसाई माळ गावाच्या शिवारात शेती कामासाठी गेले होते. ते बांधावर असणाऱया चंदनाच्या झाडाचे डहाळे शेळीला चारा म्हणून मोडण्यासाठी गेले. डहाळे मोडण्यात व्यस्त असताना तेथेच असणाऱया लिंबाच्या मोठय़ा झाडावरून अचानक बिबटय़ाने झडप घातली. धोंडिराम देसाई अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावून गेले. पहिल्यांदा वानराने उडी मारली असे वाटत असतानाच बिबटय़ा दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी ओरडायचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड घाबरगुंडी उडालेल्या अवस्थेत तोंडातून आवाजच निघेना. अशा परिस्थितीमध्ये बिबटय़ाला एका हाताने मानेवरून कसे तरी झटकले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. शिवारात असलेल्या प्रमोद आणि बाबू या शेतकऱयांनी पाहिले असता त्यांना बिबटय़ा दिसला. दोघेही आरडाओरडा करत बिबटय़ाच्या दिशेने धावले आणि बिबटय़ाने धूम ठोकली.
धोंडिराम देसाई यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर बिबटय़ाच्या पंजाचा निसटता ओरखडा उठला आहे. या परिसरात बिबटय़ाचे दर्शन नित्याचे झाले आहे. वनविभागालाही त्याची कल्पना आहे. परंतु लोकांच्या जीवावर हे संकटच बेतू लागले आहे. मागील सहा वर्षांपूर्वी एका शेतकऱयावर उसामध्ये काम करत असताना बिबटय़ाने जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते. याशिवाय अनेकवेळा पाळीव आणि भटकी कुत्री, शेळ्या बिबटय़ाने फस्त केल्या आहेत. जखमी देसाई यांना कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया बनकर यांनी प्राथमिक उपचार केले. हिंस्त्र श्वापद प्रकरणी उपचारासाठी वापरली जाणारी लस उपलब्ध नसल्याने दुसऱया दिवशी येण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱयांनी केली.