ट्रक अन् बसची धडक ः 40 हून अधिक जण जखमी
वृत्तसंस्था/लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सोमवारी बस आणि ट्रकची धडक झाली असून या दुर्घटनेत 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. दुर्घटनेत 40 हून अधिक जण जखमी झाले असून यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुजफ्फरगढच्या डेरा गाजी खाननजीक ही दुर्घटना घडली आहे.
बसमध्ये 75 प्रवासी होते, यातील बहुतांश जण ईदच्या सुटीनिमित्त घरी जाणारे मजूर होते. बस सियालकोटहून राजनपूर येथे जात होती. दुर्घटनास्थळी बचाव तसेच मदत पथक पोहोचले आहे. मृतदेह आणि जखमींना सरकारी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती संबंधित भागाचे आयुक्त डॉ. इरशाद अहमद यांनी दिली आहे. पाकिस्तानचे माहिती-प्रसारण मंत्री फवाद चौधरी तसेच गृहमंत्री शेख रशीद यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पाकिस्तानात वारंवार भीषण रस्ते दुर्घटना होत असतात. यातील बहुतांश दुर्घटना भरधाव वाहने, खराब रस्ते आणि अप्रशिक्षित चालकांमुळे होतात.