राज्यात 9,730 ठिकाणांहून लसीचे वितरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात आतापर्यंत 8.02 लाख लाभार्थींपैकी 3.81 लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थींपैकी 45 टक्के लोक लसीकरणासाठी हजर राहिले. राज्यातील 9,730 ठिकाणांहून लस वितरीत करण्यात येत आहे.
शनिवारी 832 केंद्रांमधून 96,872 लाभार्थींची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती. यापैकी 22,787 जणांनी लस घेतली आहे. उर्वरित लाभार्थींनी लसीकरणातून माघार घेतली असून विविध कारणे दिली आहेत. कारवार जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्हय़ांमध्ये लसीकरण अभियान सुरू आहे. चित्रदुर्ग जिल्हय़ात शनिवारी 100 टक्के आरोग्य कर्मचाऱयांनी लस घेतली. त्याठिकाणी 500 जणांची निवड करण्यात आली होती. बिदर, यादगिरीसह 24 जिल्हय़ांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थी गैरहजर होते.
देशभरात कोरोना लसीकरण अभियान 16 जानेवारीपासून यशस्वीपणे सुरू आहे. लसीकरण मोहिमेच्या 21 व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत सुमारे 53 लाख नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. 21 व्या दिवशी सायंकाळपर्यंत 3.31 लाख आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. देशभरात पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱयांच्या लसीकरणानंतर आता सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.