प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होवू नये यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी दि. 15 मे पर्यंत निःशुल्क उपलब्ध करुन देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी नुकतीच दिली आहे.
भविष्यातही ब्रेक द चेन अंतर्गत शासनाकडून शिवभोजन थाळी निःशुल्क उपलब्ध करुन देण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. साताऱयात ही परराज्यातील बहुसंख्य मजुर हे रोजगारासाठी आलेले आहेत. सध्या सर्वच व्यवसाय हे ठप्प असल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना एकवेळचे जेवण मिळणे ही मुश्किल बनले आहे. त्यातच मोफत मिळणारी शिवभोजन थाळी ही त्यांना एकमेव आधार बनली आहे. सकळी 11 ते दुपारी 3 या वेळेत येथे पार्सल स्वरूपात मोफत जेवण देण्यात येत आहे.
सातारा शहरात एकुण पाच ठिकाणी शिवभोजन थाळी अंतर्गत गरजु नागरिकांना जेवण देण्यात येते. यामध्ये जिल्हा पंचायत आवार, स्टँड, तहसीलदार कार्यालय आवार, मोती चौक व सिव्हील हॉस्पिटल या ठिकाणी ही सेवा पुरविण्यात येते. तरी सातारा जिह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कार्यरत असलेल्या शिवभोजन केंद्रांवर शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकाऱयांनी यांनी केले आहे.