ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पूर्व ऑनलाईन नोंदणीविनाच लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गेल्यावर या नागरिकांची नोंदणी होणार आहे.
1 मे पासून देशात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली. लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी पूर्व ऑनलाईन नोंदणी आवश्यक होती. ऑनलाईन नोंदणी करताना नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. तसेच काही ठिकाणी ऑनलाईन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी लोक गैरहजर राहत होते. त्यामुळे लस वाया जाण्याचीही शक्यता होती. त्यामुळे केंद्र सरकारने पूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया मागे घेतली.
आता 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांना लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होईल.