मुंबई उच्च न्यायालयाची सक्त सूचना, : टॅक्सींना मीटर न बसविण्याचे प्रकरण,,आज पुन्हा होणार सुनावणी
प्रतिनिधी /पणजी
टॅक्सींना मीटर बसवण्याऐवजी ऍप बेज्ड टॅक्सी चालविण्याची तयारी दर्शवून न्यायालयीन अवमानाची दखल घेऊ नये, अशी याचना आता बसमालक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. मात्र न्यायपीठाने आधी मीटर बसवा, नंतरच बोला नाहीतर याचिका मागे घ्या, अशी सूचना करुन सदर याचिकेवरील सुनावणी आज बुधवार 11 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
गोवा बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर आता टॅक्सी चालकांच्या मदतीला धावले आहेत. त्यांच्या सोबत दोन टॅक्सी मालक महमद खान व नेल्सन कुरैय्या याचिकादार आहेत. या दोन्ही टॅक्सी मालकांनी आपल्या टॅक्सींना मीटर बसवले आहेत. मीटर सोबत बील प्रिंटर, पॅनिक बटन आणि ट्रेकिंग डिव्हायस बसविण्यात आला आहे. ही चार नवी उपकरणे बसवल्यामुळे काय त्रास होतो हे न्यायपीठाच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही चार उपकरणे बसवल्यामुळे कारची बॅटरी उतरते, त्यासाठी टॅक्सींना मीटर बसवण्याची सक्ती असू नये, अशी बाजू मांडण्यात आली.
वेगवेगळय़ा कारणांतून अडथळय़ाचा प्रयत्न
कारची बॅटरी उतरते हे मीटर न बसवण्याचे कारण असू शकत नाही. फक्त मीटरच नव्हे तर पॅनिक बटन आणि टेकिंग डिव्हायस महत्त्वाचे आहेत. याची जाणीव न्यायालयाने करुन देताच पॅनिक बटन आणि जीपीएस ट्रेकिंग डिव्हायसचे टॅक्सी मालकांनी स्वागत केले आहे आणि ही दोन यंत्रे बसविण्याची तयारी याचिकादाराच्या वकिलांनी दर्शविली. ही दोन यंत्रे बसवल्यास कार बॅटरीवर परिणाम होणार नाही का? याची विचारणा न्यायपीठाने केली. मीटर न बसवण्यासाठी वेगवेगळी निमित्ते करुन अडथळा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
ऍप बेज्ड टॅक्सी हवी
गोवा माईल ऍप बेज्ड टॅक्सी आहे. ओला, उबर या टॅक्सींनाही मीटर नाही. त्यांना मोबाईलवर ऍप बेज्ड टॅक्सी चालवण्यास मान्यता आहे, मग गोव्यातील पर्यटक टॅक्सींना मीटरची सक्ती का? असा प्रश्न याचिकादारांनी उपस्थित केला आहे.
… तर सरकार काहीच करु शकत नाही
ऍपबेज्ड टॅक्सी सेवेला या टॅक्सी मालक संघटनेचा विरोध आहे. गोवा माईल्स या ऍप बेज्ड टॅक्सी सेवेत सामील व्हायचे नसल्यास स्वतःची ऍप बेज्ड सेवा सुरु करावी, असा सरकारचा प्रस्तावही त्यांनी फेटाळला. मीटर बसवण्यासाठी येणारा पूर्ण खर्च सरकार परत करणार अशी योजनाही बनवून दिली. त्यांना भाडे दरवाढही करुन दिली. एवढे करुनही त्यांना मीटर आणि बील प्रिंटर नको असल्यास सरकार काहीच करु शकत नसल्याची बाजू सरकारी वकिलांनी मांडली.
सरकारला चर्चा करण्यास सांगावे
गोव्यातील टॅक्सी मालकांना ऍप बेज्ड टॅक्सी हवी यासाठी दि. 19 जुलै 2021 रोजी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. चर्चा करण्यास वाहतूक खात्याने बोलवावे अशी विनंती केली आहे. न्यायपीठासमोर अवमान याचिका असल्याने सरकार योग्य निर्णय घेत नाही. तूर्त मीटर बसवण्याचे थांबवून दि. 19 जुलै रोजी दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यास सरकारला सांगावे, अशी याचना टॅक्सी मालकांच्यावतीने मांडण्यात आली.
मीटर बसवल्यानंतरच टॅक्सीवाल्यांची बाजू ऐकून घ्यावी
मीटर सक्तीचा कायदा आहे, व जोपर्यंत कायदा आहे तोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणे आवश्यक आहे. 2019 मध्ये न्यायालयाने आदेश दिला होता. त्याचे पालन अजून होत नसल्याने आता न्यायालयीन अवमान याचिका सुरु आहे. मीटर न बसवणाऱया टॅक्सीचे परमीटर रद्द केले जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे. आता मीटर बसवल्यानंतरच बाजू ऐकून घ्यावी, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.
याचिका मागे घेता का फेटाळू ? : न्यायपीठाचा सवाल
टॅक्सींना मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला आणि न्यायपीठासमोर चालू असलेल्या सुनावणीला अडथळा निर्माण करण्यासाठी वेगवेगळय़ा रुपात याचिका सादर केल्या जात आहेत. त्यामुळे बसमालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर यांनी केलेली याचिका मागे घेतली जाईल की ती फेटाळण्यात यावी, अशी विचारणा न्यायपीठाने केली. आपल्या अशिलाला विचारुन योग्य उत्तर सादर करण्याचे याचिकादाराच्या वकिलांनी सांगितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी परत आज बुधवारी ठेवली आहे.