मनपा आयुक्त वेळेवर न आल्याने कार्यकर्ते संतप्त : डॉ. आंबेडकर प्रतिमेच्या अनावरणप्रसंगी चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका कार्यालय आवारात उभारलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागविणारी प्रतिमा बसविण्यात आली आहे. या प्रतिमेच्या अनावरणप्रसंगी मनपा आयुक्त रुदेश घाळी वेळेवर उपस्थित झाले नसल्याने कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून निषेध नोंदविण्यात आला. मात्र प्रतिमेचे उद्घाटन झाल्यानंतर आयुक्तांचा जयजयकार करण्यात आला. यामुळे मनपा कार्यालयात चर्चेचा विषय बनला होता.
नव्याने उभारलेल्या संसदीय प्रतिकृतीतील इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच इमारतीमध्ये प्रतिमा लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. सदर प्रतिमा बसवून मनपा आयुक्तांच्या हस्ते अनावरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी कार्यक्रम करण्याचे निश्चित केले होते. ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाची तयारी झाली. महापालिका आयुक्त रुदेश घाळी सकाळी 11 वाजता येणार होते, पण ते वेळेवर आले नाहीत. दुपारचा एक वाजला तरी आयुक्त न आल्याने दलित संघटनांच्या पदाधिकाऱयांचा पारा वाढला.
गैरसमज केला दूर
आयुक्तांना दलित संघटनांचा आदर नसल्याचा आरोप करून महापालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून आयुक्तांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच मनपा आयुक्त दलित विरोधी असल्याची टीका करून धिक्कार करण्यात आला. पण त्याचवेळी महापालिका सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी दाखल झाल्या. प्रतिमा अनावरणाची तारीख आणि वेळ आयुक्तांना माहीत नसल्याचे सांगितले. आयुक्तांना माहिती नसल्याने ते येऊ शकले नाहीत. पण आता त्यांना माहिती दिली असून अर्ध्या तासात येतील, असे सांगितले. त्यामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर झाला.
अर्ध्या तासानंतर आयुक्त हजर
अर्ध्या तासानंतर महापालिका आयुक्त आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे अनावरण झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच महापालिका आयुक्तांचा जयजयकार करण्यात आला. त्यामुळे मनपा कार्यालय आवारात याची जोरदार चर्चा सुरू होती. प्रतिमा अनावरणप्रसंगी विविध दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.