क्रोएशिया ग्रँड चेस टूर – आनंदचा कॅस्पारोव्हवर दुसरा विजय
वृत्तसंस्था/ झाग्रेब, क्रोएशिया
भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने येथे झालेल्या क्रोएशिया ग्रँड चेस टूर स्पर्धेत दुसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत त्याने प्रभावी प्रदर्शन करताना माजी वर्ल्ड चॅम्पियन व त्याचा दीर्घ काळपर्यंत प्रतिस्पर्धी राहिलेल्या गॅरी कॅस्पारोव्हवर दोनदा विजय मिळविले.
आनंदने ब्लिट्झमधील पहिल्या दिवशी शनिवारी कॅस्पारोव्हवर विजय मिळविल्यानंतर 13 व्या फेरीत शानदार प्रदर्शन करीत या महान खेळाडूवर आणखी एक विजय मिळविला. फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हने एक फेरी बाकी असतानाच जेतेपद निश्चित केले. त्याने एकूण 22 गुण मिळविले. लॅग्रेव्हनेही 17 व्या फेरीत कॅस्पारोव्हवर मात केली होती. आनंदने 18 व्या फेरीत अलेक्झांडर ग्रिस्चुकला बरोबरीत रोखत एकूण 21 गुणांची कमाई करीत अग्रमानांकित इयान नेपोमनियाचीला मागे टाकून दुसरे स्थान मिळविले. उपांत्य डावात आनंदने अझरबैजानच्या शॅख्रियार मॅमेद्यारोव्हला बरोबरीत रोखले. आनंदला उपविजेतेपदाचे 25000 डॉलर्सचे बक्षीस मिळाले. आनंदने 17 व्या फेरीत कॅस्पारोव्हविरुद्ध काळय़ा मोहरांनी खेळताना निमझो इंडियन बचावाचा अवलंब केला आणि 25 चालीतच त्याने विजय साकार केला. त्याआधी 10, 11, 12 व्या फेरीत आनंदने हॉलंडचा अनिश गिरी, पोलंडचा जॅन ख्रिस्तॉफ डुडा व लॅग्रेव्हविरुद्धचे तीन डाव अनिर्णीत राखले होते. त्यानंतरच्या 14 व्या डावात त्याने अग्रमानांकित नेपोमनियाचीला पराभवाचा धक्का दिला. याशिवाय आनंदने युक्रेनचा अँटोन कोरोबोव्ह, हॉलंडचा जॉर्डन व्हान फॉरीस्ट यांच्यावर विजय मिळविले तर मॅमेद्यारोव्हविरुद्ध बरोबरी साधली.
शनिवारी ब्लिट्झ विभागातील पहिल्या दिवशी आनंदने चार विजय मिळविले, तीन डाव अनिर्णीत राखले आणि दोन डावांत त्याला पराभव स्वीकारावा लागला. रॅपिड विभागात आनंदने 9 गुण घेत सातवे स्थान मिळविले होते. या विभागात त्याने दोन सामने जिंकले, पाच अनिर्णीत राखले आणि दोन सामने गमविले होते.