राघव चड्ढा यांच्याकडून गोमंतकीयांना चतुर्थीच्या शुभेच्छा
प्रतिनिधी /पणजी
गणेश चतुर्थी निमित्त आम आदमी पार्टीने काढलेल्या आरती संग्रहाचे आपचे राष्ट्रीय संयोजक राघव चड्ढा यांच्याहस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या संग्रहात विविध आरती आणि गणेशभक्तांना शुभेच्छांचा समावेश आहे.
या संग्रहाद्वारे आम आदमी पक्षाने तमाम गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. चतुर्थी हा सण गोव्यातील सर्वात मोठा आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यानिमित्त प्रत्येक गोमंतकीय किमान दोन दिवसांसाठी संपूर्ण दिवस आपल्या घरी राहतात, अशी परंपरा आहे. त्यामुळे हा संग्रह प्रत्येकाच्या घरी पोहोचविण्यात येणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यात बोलताना श्री. चड्ढा यांनी सर्व गोमंतकीयांना चतुर्थीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. अत्यंत आकर्षक स्वरुपात निर्मिती करण्यात आलेल्या या संग्रहाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनीही सर्व गोमंतकीयांना शुभेच्छा व्यक्त केल्या व श्रीगणेशाची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सर्वांवर राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष महादेव नाईक आणि इतरांनीही या संग्रहाच्या माध्यमातून तमाम गोमंतकीयांना चतुर्थीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
अरविंद केजरीवाल यांच्याहस्ते आज होणार महाआरती सर्व प्रमुख वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण
गणेश चतुर्थी निमित्त आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीत भव्य गणेश आरती आयोजित करणार आहेत. तमाम गोमंतकीयांनाही यात सहभागी होता यावे यासाठी सर्व प्रमुख वाहिन्यांवरून या आरतीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. आज शुक्रवार 10 रोजी संध्याकाळी 7 वाजता ही आरती प्रसारित करण्यात येणार आहे.
आम आदमी पक्षाने गोमंतकीयांना चतुर्थीच्या शुभेच्छा देताना सर्व अडचणींपासून प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना गणरायाकडे केली आहे.
देशवासियांमध्ये एकात्मतेची भावना वाढविण्याच्या उद्देशाने गेल्या वषी दिवाळी दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजनामध्ये भाग घेतला होता. दिल्लीतील जनतेने याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता तोच उद्देश ठेऊन तमाम गोमंतकीयांनी जाती धर्माचा भेदभाव न बाळगता या महाआरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले आहे.