सलग तीन वर्षे 101 ते 150 क्रमवारीत
प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या “ नॅशनल इन्स्टिट्यूशनल रैंकिंग फेमवर्क” (एनआयआरएफ) च्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठ देशात 101 ते 150 दरम्यानचे स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय क्रमवारीत सलग तीन वेळा याच स्थानावर शिवाजी विद्यापीठ आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी दिली.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग प्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) ही देशातल्या ‘टॉप-100’ विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांची क्रमवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठ 101 ते 150 दरम्यान स्थान मिळाले आहे विविध खाजगी संस्था विविध प्रकारच्या निकषांवर शैक्षणिक संस्थांच्या निरनिराळ्या क्रमवारी प्रसिद्ध करीत असतात. तथापि, या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दि. 29 सप्टेंबर 2015 रोजी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल
रँकिंग प्रेमवर्क’ची निर्मिती केली. अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर ही क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे व महाविद्यालये यांच्यासाठीच्या क्रमवारीखेरीज अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर या क्षेत्रांतील विशेष शैक्षणिक संस्थांचीही स्वतंत्र क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी राज्यात आठव्या स्थानी
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशात राबविण्यात आलेल्या “ नॅशनल इन्स्टिटयुशनल रैंकिंग फेमवर्क” (एनआयआरएफ) च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरने देशात 49 वे तर राज्यात 8 वे स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय क्रमवारीत सलग सहा वेळा स्थान पटकाविलेले शिवाजी विद्यापीठ संलग्नित एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे.
भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या प्रेरणेने कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, , मानद संचालक डॉ. एच. एम. कदम आदींच्या पाठबळामुळे हे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी केले.