पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात राज्यांना सूचना : मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीची दिली माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कर्नाटकासह सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी राज्य आपत्ती नियंत्रण निधीतीन 50 टक्के रक्कम वापरण्याची सूचना सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यातील कोरोना नियंत्रण आणि परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी चर्चा केली. देशातील एकूण 63 टक्के कोरोना रुग्ण आणि 77 टक्के रुग्णांच्या मृत्यूंची नोंद या सात राज्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे बुधवारी पंतप्रधानांनी या राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना आणि कोरोना रुग्णांची आकडेवारी, चाचण्या, उपचाराबाबतची माहिती दिली. बैठकीप्रसंगी आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर, राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉ. ई. व्ही. रमणरेड्डी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.