अमानतुल्लाह खान दोषी ः मुख्यमंत्र्यांसह 9 आरोपींची मुक्तता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी विशेष न्यायालयाने आम आदमी पक्षाचे दोन आमदार अमानतुल्लाह खान आणि प्रकाश जरवाल यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि ‘आप’च्या 9 आमदारांची मुक्तता करण्यात आली आहे.
नितिन त्यागी, रितुराज गोविंद, संजीव झा, अजय दत्त, राजेश ऋषी, राजेश गुप्ता, मदन लाल, प्रवीण कुमार आणि दिनेश मोहनिया या आमदारांना आरोपमुक्त करण्यात आले आहे.
केजरीवालांच्या निवासस्थानात मारहाण
2018 मध्ये दिल्लीचे मुख्य सचिव राहिलेल्या अंशू प्रकाश यांना मारहाणीशी संबधित हा खटला आहे. 19 फेब्रुवारी 2018 रोजी केजरीवालांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीदरम्यान अंशू प्रकाश यांच्यावर कथित स्वरुपात हल्ला झाला होता. या प्रकरणी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह 13 जण आरोपी होते. अंशू प्रकाश यांच्यासोबत केजरीवालांच्या उपस्थितीत त्यांच्या आमदारांनी गैरवर्तन करत धक्काबुक्की केली होती. त्यानंतर मुख्य सचिवांनी रात्रीच उपराज्यपालांना भेटून यासंबंधी तक्रार केली होती. ‘3 साल केजरीवाल’ या जाहिरातीवरून मुख्य सचिवांशी मुख्यमंत्र्यांचा वाद झाला होता.
आप नेत्यांनी पुरावे लपविले
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात कटांतर्गत अंशू प्रकाश यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले गेले होते. तसेच आप नेत्यांनी पुरावे देखील लपविले होते, घटनेपूर्वी अनेक सीसीटीव्हींचे कनेक्शन तोडण्यात आले होते असेही आरोपपत्रात नमूद आहे.