महसूल खात्यातर्फे सरकारला प्रस्ताव
प्रतिनिधी / पणजी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) स्थापन करण्यासाठी पेडणे येथील जागेची निवड सरकारने निश्चित केली असून तशा आशयाचा प्रस्ताव महसूल खात्यातर्फे सरकारकडे पोहोचल्याचे वृत्त मिळाले आहे, पेडणे येथे नेमकी कोणती जागा याचा मात्र त्यात उल्लेख नाही, मात्र ती जागा पेडणे पालिका क्षेत्रातील असावी असा अंदाज आहे.
केंद्र सरकारने गोव्याला 2016 साली आयआयटी बहाल केली असून त्याला आज 4 ते 5 वर्षे झाली तरी जागा शोधून ती साकार करण्यास सरकारला अपयश आले आहे. सदर नॅशनल इन्स्टिटय़ूटसाठी जागा शोधण्याकरीता राज्य सरकारने खास समिती नेमली होती. त्या समितीने काणकोण, सांगे, शेळ-मेळावली अशी काही ठिकाणे शोधली व तेथे हा प्रकल्प करण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु सर्व ठिकाणी त्यास विरोध झाल्यामुळे सरकारलाच माघार घ्यावी लागली.
शेळ-मेळावली येथे तर ग्रामस्थांनी मोठे आंदोलन करून सरकारला टक्कर दिली. येथे आयआयटी करण्याचा चंग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बांधला होता. अनेक दडपणे आली पण शेवटी नेथील ग्रामस्थांच्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले. आता पेडणे येथे आयआयटी करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला असून तेथे त्यास विरोध होतो का पाठिंबा मिळतो ते आगामी काळात दिसून येणार आहे.