वृत्तसंस्था / पणजी
गोव्यातील जैव सुरक्षित बबलमध्ये दाखल होण्यापूर्वी इंडियन सुपर लीग क्लब्समधील एकूण सहा फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाली होती, असे सांगण्यात आले.
सदर खेळाडू एटीके मोहन बगान, लीग चॅम्पियन्स एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी या संघातील आहेत. यातील दोन खेळाडू पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून अन्य चार खेळाडू आपापल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहत आहेत, असे क्लबतर्फे सांगण्यात आले. आयएसएलच्या नियमावलीनुसार, एखादा खेळाडू कोव्हिड 19 बाधित झाल्याचे आढळल्यास स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या खेळाडूला 14 दिवसांसाठी आयसोलेट व्हावे लागते. त्यानंतर 10, 12 व 14 व्या दिवशी त्याला तीनदा सक्तीची चाचणी करून घ्यावी लागते. 12 व 14 व्या दिवशीचे अहवाल निगेटिव्ह आले तरच त्याला गोव्यात पाठविण्यात येते. यासाठी त्याला आरोग्याधिकाऱयांकडून फिटनेसचा दाखल लीगकडे सादर करावा लागतो. ‘एक खेळाडू हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी गेला होता तेव्हा तो पॉजिटिव्ह आढळून आला. त्याआधीच्या दोन चाचण्यात तो निगेटिव्ह आला होता. मात्र तिसऱया चाचणीत तो पॉजिटिव्ह ठरला होता,’ असे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्राने सांगितले.
एटीके मोहन बगान, एफसी गोवा, हैदराबाद यांना कोरोना प्रकरणे निपटावी लागत आहेत तर बेंगळूर एफसीचे खेळाडू जे बेंगळूरमध्येच आहेत, त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. केरळा ब्लास्टर्सचे खेळाडूंही पहिल्या चाचणीत निगेटिव्ह आले आहेत.