वृत्तसंस्था/ लॉसेनी
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे विद्यमान अध्यक्ष जर्मनीचे 66 वर्षीय थॉमस बाक यांना दुसऱयांदा अध्यक्षपद मिळणे निश्चित झाले आहे. जर्मनीचे बाक हे निष्णात वकील आहेत. येत्या मार्चमध्ये ऍथेन्स येथे होणाऱया आयओसीच्या बैठकीमध्ये ते बिनविरोध या पदासाठी निवडले जातील, असे आयओसी कार्यकारिणीने सांगितले. त्यांची चार वर्षाची ही दुसरी व शेवटची टर्म असेल.
2013 च्या सप्टेंबरमध्ये थॉमस बाक यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाकरिता आठ वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली होती. तत्पुर्वी बेल्जियमचे जॅक्विस रॉगी हे आयओसीचे अध्यक्ष होते. मार्चमध्ये होणाऱया आयओसीच्या बैठकीत बाक यांची अध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्यात आली तर त्यांचा अध्यक्षपदाचा कालावधी 2025 पर्यंत राहिल. 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरीसमध्ये होणार आहे. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीने बाचा यांचा अध्यक्षपदाचा कालावधी संपणार आहे. आयओसीच्या अध्यक्षपद निवड प्रक्रियेला 2020 च्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सुरुवात केली जाणार होती. पण कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. थॉमस बाक हे आपल्या वैयक्तिक क्रीडा कारकीर्दीत कुशल समशेरबाज म्हणून ओळखले जात होते. 1976 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी तत्कालिन पश्चिम जर्मनी संघाला फॉईल समशेरबाजी सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. बाक यांनी आयओसीच्या ऍथलिटस् आयोग सदस्यांमध्ये स्थान मिळविल्यानंतर ते आयओसीचे नववे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत 2016 ची रिओ ऑलिम्पिक स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाली होती.