30 शहरात शोरूम्स सुरू होणार – उत्पादन प्रक्रियेला मिळणार गती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फर्निचरच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया आयकीया कंपनीने भारतामध्ये आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याचे निश्चित केले असून येणाऱया काळामध्ये 30 शहरांमध्ये शोरूम सुरू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. देशातील उत्पादन प्रकल्पांना गती देण्यासाठी आयकीया जोरदार प्रयत्न करणार आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे विविध व्यवसाय तर ठप्प होतेच वाहतुक व्यवस्थाही कोलमडल्याने पुरवठा ठप्प झाल्याने उत्पादन कारखान्याचे बांधकाम करता आले नाही. परिणामी आयकीयाच्या भारतातील व्यवसाय विस्तारावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला. आता कंपनीला आपल्या प्रकल्पाच्या कामाला गतीने सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर प्रकल्पाचे काम सुरू करून इतर शहरांमध्ये शोरूम सुरू करण्याचा मनोदय कंपनीचे सीईओ पीटर बेटजेल यांनी rव्यक्त केला आहे. पुढील 7 वर्षांच्या काळामध्ये भारतातील 30 शहरांमध्ये कंपनीला आपली शोरूम्स सुरू करायची आहेत. यासाठी येणाऱया काळामध्ये गतीने पावले उचलली जाणार आहेत.
कंपनीचे आगमन
कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये मुंबईमध्ये आपली दुसरी शोरूम सुरू केली. याशिवाय बेंगळूरमध्ये शोरूमचे काम सुरू असून 12 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 2018 मध्ये कंपनीची पहिली शोरूम हैदराबादमध्ये सुरू झाली. या अनुषंगाने भारतीय बाजारात फर्निचर क्षेत्रातील आयकीयाने थाटात प्रवेश केला आहे. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये 2 वर्षात कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
रिलायन्सशी होणार टक्कर
आयकीया आपल्या व्यवसायाचा विस्तार भारतात जोमाने करण्याच्या तयारीत असतानाच आता त्यांना रिलायन्सशी टक्कर द्यावी लागणार आहे. अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजने फर्निचर क्षेत्रात असणाऱया ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची खरेदी केली आहे. या माध्यमातून रिलायन्स फर्निचर क्षेत्रामध्ये भारतात आपला दबदबा ठेवण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगितले जात आहे. यांची टक्कर अर्थातच आयकियाशी होणार असल्याचे सांगितले जाते.