लसिथ मलिंगाचा 170 बळींचा विक्रम मागे, ब्रेव्होच्या खात्यावर 153 सामन्यात 171 बळी
मुंबई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचा अनुभवी अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्होने गुरुवारी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक बळींचा लसिथ मलिंगाचा विक्रम मागे टाकला. लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध साखळी सामन्यादरम्यान त्याने हा माईलस्टोन पार केला. ब्रेव्होच्या खात्यावर आता 153 आयपीएल सामन्यात 171 बळी आहेत.
ब्रेव्होने यापूर्वी श्रीलंकेचा दिग्गज माजी जलद गोलंदाज लसिथ मलिंगाच्या 170 बळींच्या आयपीएल विक्रमाशी बरोबरी साधली होती. गुरुवारी त्याने लखनौ सुपरजायंट्सचा फलंदाज दीपक हुडाला डावातील 18 व्या षटकात बाद करत मुंबईच्या मलिंगाचा विक्रम मागे टाकला. ब्रेव्होला हा विक्रम त्यापूर्वीच मोडणे शक्य झाले असते. मात्र, मोईन अलीने क्विन्टॉन डी कॉकचा सोपा झेल सोडल्याने त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागली होती.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सतर्फे मलिंगाने 122 सामन्यात 170 बळी घेतले आहेत. योगायोग म्हणजे 2008 मध्ये मलिंगा दुखापतग्रस्त झाल्यामुळेच ब्रेव्होला आयपीएलमध्ये पहिली संधी मिळाली होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये ब्रेव्हो-मलिंगानंतर अमित मिश्रा 166 बळींसह तिसऱया स्थानी विराजमान आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
गोलंदाज / कालावधी / सामने / बळी / सर्वोत्तम
डेव्हॉन ब्रेव्हो / 2008-2022 / 153 / 171 / 4-22
लसिथ मलिंगा / 2009-2019 / 122 / 170 / 5-13
अमित मिश्रा / 2008-2021 / 154 / 166 / 5-17
पियुष चावला / 2008-2021 / 165 / 157 / 4-17
हरभजन सिंग / 2008-2021 / 163 / 150 / 5-18
रविचंद्रन अश्विन / 2009-2022 / 168 / 145 / 4-34
सुनील नरेन / 2012-2022 / 137 / 144 / 5-19
भुवनेश्वर कुमार / 2011-2022 / 133 / 143 / 5-19