पाकिस्तानी खेळाडू लाख इच्छा असूनही आयपीएल खेळू शकत नाहीत, हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. एक पाकिस्तानी खेळाडू मात्र यानंतरही बिनधास्तपणे आयपीएल खेळण्यासाठी अगदी पुढच्या दरवाजाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये केकेआर संघासमवेत आहे तो म्हणजे जलद गोलंदाज अली खान! अली खान मूळ पाकिस्तानचा. मात्र, आयपीएलपर्यंतचा त्याचा प्रवास व्हाया अमेरिका राहिला आहे. अली खान हा आयपीएल खेळणारा अमेरिकेचाही पहिलाच खेळाडू. आयपीएल स्पर्धेत पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच तो प्रकाशझोतात आला. इंग्लिशमन हॅरी गर्नी दुखापतीमुळे हंगामातून बाहेर फेकला गेल्यानंतर अंतिम क्षणी कोलकाता नाईट रायडर्स संघाने अली खानला करारबद्ध केले.
अली खानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आणि तो वाढलाही तेथेच. पुढे तो 29 वर्षाचा झाला, त्यावेळी त्याचे कुटुंब पाकिस्तानमधून अमेरिकेच्या ओहियो येथे स्थायिक झाले. 2013 मध्ये अलीने यूएस ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेत ऑल स्टार्स टीममधून खेळण्यास सुरुवात केली. यात अपेक्षित यश मिळत नसल्याने व्यावसायिक क्रिकेटला रामराम ठोकण्याचा त्याचा विचार होता. पण, त्याचवेळी 2017 मध्ये त्याला डेव्हॉन ब्रेव्होने गुणवत्ता हेरत यूएस ओपनसाठी संधी दिल्याने त्याचे नशीब उजळले.