वॉर्नर, अश्विन, बोल्ट, कमिन्ससह 48 खेळाडू 2 कोटी रुपयांच्या टॉप ब्रॅकेटमध्ये
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आयपीएल महालिलावासाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन, श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, कॅगिसो रबाडा यांच्यासह 48 खेळाडू 2 कोटी रुपयांच्या टॉप ब्रॅकेटमध्ये समाविष्ट असून एकूण 590 खेळाडू बोलीसाठी उपलब्ध असतील. दि. 12 व 13 फेब्रुवारी रोजी बेंगळूरमध्ये हा लिलाव रंगणार आहे.
मागील महिन्यात 1214 खेळाडूंची नोंदणी झाली. त्यात प्रँचायझींनी स्वारस्य दाखवलेल्या 590 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली गेली. आयपीएल कार्यकारिणीने मंगळवारी यावर शिक्कामोर्तब केले. सदर 590 खेळाडूंमध्ये 228 खेळाडू पदार्पण केलेले आणि 355 खेळाडू पदार्पणाच्या प्रतीक्षेतील आहेत. 7 खेळाडू संलग्न राष्ट्रातील आहेत.
अनुभवी भारतीय खेळाडू मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईस कॅटेगरीत आहेत. श्रेयस अय्यर व शिखर धवन यांच्यासाठी व त्यानंतर इशान किशन, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मागील हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज हर्षल पटेल, फिरकीपटू यजुवेंद्र चहल, जलद गोलंदाज शार्दुल ठाकुर या युवा खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी 10 प्रँचायझींमध्ये अधिक चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.
चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, सनरायजर्स हैदराबाद व टीम अहमदाबाद असे 10 प्रँचायझी अव्वल खेळाडूंबरोबरच जॉनी बेअरस्टो, जेसॉन होल्डर, डेव्हॉन ब्रेव्हो, वणिंदू हसरंगा यांनाही करारबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतील. इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने देखील लिलावासाठी नोंदणी केली असून तो 2 कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये आहे.
विदेशी खेळाडूंमध्ये डय़ु प्लेसिस-बोल्टवर फोकस
या मेगा ऑक्शनसाठी उपलब्ध विदेशी खेळाडूंमध्ये फॅफ डय़ु प्लेसिस, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, रबाडा, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब हसन यांना करारबद्ध करण्यासाठी विविध प्रँचायझी प्रयत्नशील असतील. सुरेश रैना व रॉबिन उत्थप्पा यांनी स्वतःला 2 कोटी रुपयांच्या कॅटेगरीत ठेवले आहे. मात्र, त्यांना करारबद्ध करण्यासाठी प्रँचायझी कितपत उत्सुक असतील, हे प्रत्यक्ष लिलावातच स्पष्ट होऊ शकेल.
1.5 कोटी रुपयांच्या रिझर्व्ह प्राईसमध्ये 20 खेळाडू आहेत तर 1 कोटी रुपयांच्या कॅटेगरीत 34 खेळाडूंचा समावेश आहे. भारताचे यू-19 गटातील स्टार खेळाडू कर्णधार यश धुल, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर यांच्यासह शाहरुख खान, दीपक हुडा व अवेश खान यांच्यावर प्रँचायझींचा फोकस असू शकतो.
इम्रान ताहीर सर्वात वयस्कर तर अफगाणचा नूर अहमद सर्वात युवा खेळाडू!
दक्षिण आफ्रिकेचा 42 वर्षीय फिरकीपटू इम्रान ताहीर हा यंदाच्या लिलावात उपलब्ध असलेला सर्वात वयस्कर खेळाडू असेल तर अफगाणिस्तानचा 17 वर्षीय नूर अहमद सर्वात युवा खेळाडू असणार आहे. यापैकी अफगाणचा नूर अहमद सध्या विंडीजमध्ये सुरु असलेल्या यू-19 आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. सर्व यू-19 खेळाडूंमध्ये युवा भारतीय मध्यमगती गोलंदाज हंगरगेकर 30 लाखांच्या सर्वाधिक बेस प्राईस कॅटेगरीत आहे. अन्य सर्व खेळाडू 20 लाख रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये आहेत.
लिलावासाठी सर्वाधिक रक्कम पंजाब किंग्सकडे
बेंगळुरातील या आगामी मेगा ऑक्शनसाठी पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 72 कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध असेल तर सर्वाधिक 23 स्लॉटही त्यांच्याकडेच उपलब्ध आहेत. यंदाच्या लिलावात चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स यांच्याकडे 21 व्हॅकन्सी आहेत. अन्य सर्व संघांकडे प्रत्येकी 22 स्लॉट उपलब्ध आहेत.
विदेशी खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलिया टॉपवर
यंदाच्या लिलावासाठी उपलब्ध विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 47 खेळाडू उपलब्ध असतील. विंडीजचे 34 खेळाडू लिलावाच्या रिंगणात असणार आहेत. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचे 33, श्रीलंकेचे 23, इंग्लंडचे 24, न्यूझीलंडचे 24 व अफगाणचे 17 खेळाडू आपले नशीब आजमावून पाहतील.