गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) मोरजी येथे केलेल्या कारवाईत आयपीएल सट्ट्sबाजी (बेटिंग) प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, 8 मोबाईल फोन, एलईडी टीव्ही तसेच रोख रक्कम 19,200 जप्त केले आहेत. संशयितांच्या विरोधात बेकायदेशीर जुगार कायदा 1976 नुसार गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितामध्ये संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव तिघेही हैद्राबाद येथील आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. तिघेही संशयित खास सट्टा खेळण्यासाठीच आयपीएल सुरु होण्यापूर्वी गोव्यात आले होते. मोरजी येथे एका भाडय़ाच्या खोलीत ते राहत होते. गुरुवारी मुंबई इंडियन्स व पंजाब यांच्यात सुरु असलेल्या सामन्याच्या दरम्यान त्यांची सट्टेबाजी सुरु असताना सीआयडीने ही कारवाई करून संशयितांना अटक केली आहे.
देशभरातून खेळला जातो सट्टा
गेल्या कित्येक वर्षापासून संशयित आयपीएल दरम्यान सट्ट्sबाजीचा व्यवसाय करीत असतात असे तपासात उघड झाले आहे. दरवर्षी देशातील विविध भागात जाऊन त्या ठिकाणाहून ते सट्टेबाजीचा व्यवसाय करीत असतात. संपूर्ण भारतभर संशयितांनी आपले जाळे विणले असून देशातील विविध ठिकाणाहून त्यांच्याकडे सट्टेबाजीसाठी पैसे लावले जातात. ते ज्या ठाकणी राहतात त्या ठिकाणाहून सपूर्ण व्यवसाय ते हाताळत असतात. गुरुवारी रात्री हा बेकायेदीर व्यवसाय सुरु असताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
आयपीएल दरम्यान राज्यात मोठय़ा प्रमाणात सट्टेबाजी सुरु असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात कडक कारवाई करणे सुरु केले आहे. गुरुवारी कळंगुट पोलिसांनी कारवाई करून कांदोळी येथे सुरु असलेला सट्टेबाजी व्यवसाय उधळून लावला तर मोरजीतील सट्टेबाजीवर सीआयडी पोलिसांनी कारवाई केली आहे. सीआयडी निरीक्षक मंगेश वळवईकर, राहूल परब, नारायण चिमुलकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करीत आहेत.