जि.प.सदस्य अरूण कदम यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी, अस्तान ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा आरोप
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी तक्रार देवूनही चौकशी न करताच भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांना पाठीशी घालणाऱ्या येथील गटविकास अधिकारी गुरूनाथ पारसे व विस्तार अधिकारी काणेकर यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जि.प.सदस्य अरूण कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अस्तान ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी करूनही गटविकास अधिकारी पारसे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत दोघांनाही पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला. पंचायत समिती सभापती विजय कदम यांनीही याबाबत सतत सूचना देवून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी जि.प. सदस्य कदम यांच्यासह सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, माजी जि.प.सदस्या दर्शना मोरे, वामन गांजेकर व ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात केली आहे.
या तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड यांनी तात्काळ दखल घेत ५ ऑक्टोबर रोजी येथील पंचायत समितीस भेट देवून माहिती घेणार असल्याचे स्पष्ट करत भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. भरणे ग्रामपंचायत हद्दीत सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कुठल्याही बांधकाम व्यावसायिकांनी व्यवस्था केलेली नाही. ग्रामपंचायती विरोधात सातत्याने उपोषणे करून देखील ग्रामस्थांच्या तक्रारींची दखलच घेण्यात आलेली नाही.
लोटे, आवाशी, भोस्ते, वेरळ, भडगाव, खोंडेसारख्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असूनही सांडपाणी निचरा, रस्ते, पायवाटा, मोकळी जागा सोडणे याकडेही सर्वच सरपंच, ग्रामसेवक व अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करत भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, अशी आग्रही मागणीही केली आहे.
विस्तार अधिकारी शिंदेसह लाचखोर प्रशासकावरही कारवाई करा
खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे व भरणे ग्रामपंचायतीचा लाचखोर प्रशासक देवानंद मासारकर यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्य अरूण कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. लाचखोर प्रशासक मासारकर यांनी बचतगटांच्या महिलांकडूनही आर्थिक लूट केली असून हकनाक त्रासही दिला आहे. विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे हे देखील कामात कुचराई करत असून त्यांच्या विरोधातही अनेक तक्रारी असल्याने दोघांवर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे.