दुबई / वृत्तसंस्था
भारताचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह ताज्या आयसीसी कसोटी मानांकनातील गोलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानी झेपावला आहे. इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून देण्यात त्याने यापूर्वी मोलाचा वाटा उचलला होता.
बुमराहने रिव्हर्स स्विंगच्या सेन्सेशनल स्पेलमध्ये ऑलि पोप व जॉनी बेअरस्टो यांचा त्रिफळा उडवत एकच खळबळ उडवून दिली आणि तेथेच सामना भारताच्या बाजूने झुकला. त्या सामन्यातील विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने महत्त्वपूर्ण आघाडी देखील घेतली. उभय संघातील पाचवी व शेवटची कसोटी उद्यापासून (शुक्रवार दि. 10) मँचेस्टरमध्ये खेळवली जाणार आहे.
फलंदाजांच्या यादीत शार्दुल ठाकुर 2 अर्धशतकांसह 79 वरुन 59 व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीतही तो 49 व्या स्थानी झेपावलाय. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्स अव्वलस्थानी तर रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्ध न खेळताही दुसऱया स्थानी विराजमान आहे. फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार जो रुट अव्वलस्थानी आहे. रोहित शर्मा व विराट कोहली अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी राहिले.