वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 च्या आय लीग फुटबॉल हंगामाला आता नोव्हेंबरऐवजी डिसेंबर महिन्यात प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याची योजना यापूर्वी आखण्यात आली होती पण कोरोना समस्येमुळे सदर आय लीग फुटबॉल हंगामाला नोव्हेंबरमध्ये प्रारंभ करणे अवघड असल्याचे मत आय लीगचे सीईओ एस. धर यांनी व्यक्त केले.
नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात आय लीग फुटबॉल हंगामाला प्रारंभ करण्याची औपचारिक घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आली होती. या स्पर्धेतील काही सामने पश्चिम बंगालमध्ये खेळविले जाणार होते. दरम्यान कोरोना समस्येमुळे कोलकात्यातील परिस्थिती अवघड असल्याने या स्पर्धेतील सामने भरविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या स्पर्धेत सहभागी होणाऱया विदेशी फुटबॉलपटूंना भारतात येणे अवघड असल्याचे सांगण्यात आले होते. 11 संघांचा समावेश असलेली आय लीग फुटबॉल स्पर्धा तीन महिन्यांच्या कालावधीत खेळविली जाते.